पेरू येथील रहस्यमयी वाळवंटात एक विलक्षण गोष्ट आढळली आहे. तब्बल 2200 वर्षांपूर्वी रेखाटलेली एका मांजराची आकृती पुरातत्व विभागाने शोधली असून तिचा आकार अवाढव्य आहे.
पेरू येथील नाज्का नावाचं वाळवंट रहस्यमय मानलं जातं. इथल्या टेकड्यांवर जवळपास 300हून अधिक आकृत्या सापडल्या आहेत. येथील टेकड्यांवर आढळणाऱ्या या रेखाकृतींना (Geoglyphs) नाज्का लाईन्स असं म्हटलं जातं. त्यात प्राणी आणि ग्रह अशा आकृत्यांचा समावेश आहे.
पुरातत्व विभागाला इथे आधी विविध रेखा सापडल्या आणि त्यांच्या समूहाला जोडून मग ही रेखाकृती ओळखता येऊ लागली. असाच प्रकार या मांजरीच्या शोधावेळी झाला.
येथील एका टेकडीवरच्या रेखाकृतीच्या दिशेने जाणारी चढण साफ करण्याचं काम सुरू होतं. पर्यटकांना रेखाकृती जवळून पाहता याव्यात यासाठी रस्ता साफ करणं गरजेचं होतं. रस्ता साफ करताना कामगारांना जाणवलं की पायाखालची माती पुसल्यानंतर दिसणारी जमीन थोडी वेगळी दिसत आहे. त्यात पुसटशा रेखा दिसत होत्या. मग त्यांचा माग काढत तिथला सगळाच परिसर साफ करण्यात आला. त्यानंतर जे दिसलं त्याने तेथील लोक थक्क झाले. कारण, या रेखा थोड्याथोडक्या नाहीत, तर 121 फुटी लांब होत्या आणि त्यातून स्पष्टपणे मांजराचं चित्र दिसत होतं. हे चित्र इसवी सन पूर्व 200 या काळात बनवलं गेल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
पेरू येथील नाज्का लाईन्स हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. या रेखाकृतींचा शोध सर्वप्रथम 1927मध्ये लागला होता. या रेखाकृती इतक्या मोठ्या आहेत की, अवकाशातून किंवा उपग्रहातूनही त्या स्पष्ट दिसतात. काही तज्ज्ञांच्या मते तत्कालीन नाज्का संस्कृतीतील माणसं आकाशातील देवाला पाहता यावीत किंवा देवाला संदेश देता यावा, म्हणून अशा प्रकारे मोठ्या रेखाकृती बनवत असत. यातील काही रेखाकृती इसवी सन पूर्व 500व्या शतकाइतक्या जुन्या आहेत. जमिनीचा वरचा थर खोदून खाली दिसणाऱ्या खडकावर या आकृती कोरण्यात आल्या आहेत. यात पक्षी, प्राणी, मानवी चेहरा असलेला प्राणी, दोन तोंडांचा साप, किलर व्हेल मासा अशा निरनिराळ्या आकृतींचा समावेश आहे.