राहुल मोरे. नागपूर प्रतिनिधी
नागपूर, दि.29 : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलद्वारे करडी नजर ठेवण्याचे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
पदवीधर निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी सर्व पक्षांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. निवडणुकीतील प्रचार कसा असावा या संदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट सूचना राजकीय पक्षाना दिल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये विविध समाज माध्यमांचा गैरवापर होणार नाही, आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.
पदवीधर निवडणुकीसंदर्भात समाज माध्यमांवर धडकणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टवर नजर ठेवण्यासाठी सायबर सेल वाच ठेऊन आहे.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांचा वापर होत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा देखील वापर होत आहे. निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती (एमसीएमसी) जिल्ह्यात कार्यरत आहे. या समितीने यासंदर्भात प्रमाणीकरणाचे काम देखील केले आहे. तथापि, परवानगी न घेता व्हाट्सअप किंवा अन्य सोशल माध्यमांवर कोणी आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास त्यावर कडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश सायबर सेलला दिले आहे.
निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना वृत्तपत्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहिरातींचे देखील प्रमाणीकरण करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.